सिल्लोडच्या १०७ गावांच्या वॉटर ग्रीडला गती द्या! मंत्री गुलाबराव पाटील यांचे कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सोयगाव तालुक्यासाठीही वॉटर ग्रीडचा प्रस्ताव; फर्दापूर–अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा

सिल्लोडच्या १०७ गावांच्या वॉटर ग्रीडला गती द्या! मंत्री गुलाबराव पाटील यांचे कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सिल्लोडच्या १०७ गावांच्या वॉटर ग्रीडला गती द्या! मंत्री गुलाबराव पाटील यांचे कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई दि २८ :- सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांना दिलासा देणाऱ्या प्रलंबित वॉटर ग्रीड योजनेच्या कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत आणि योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी योजनेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीत सिल्लोड तालुक्यातील वॉटर ग्रीड योजनेची रखडलेली कामे, सोयगाव तालुक्यासाठी स्वतंत्र वॉटर ग्रीडचा प्रस्ताव आणि फर्दापूर–अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याला प्राधान्य

पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांच्या वॉटर ग्रीड योजनेतील उर्वरित कामे विनाविलंब पूर्ण करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

यासोबतच सोयगाव तालुक्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी वॉटर ग्रीडचा प्रस्ताव तसेच फर्दापूर आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील पाण्याच्या प्रश्नांवरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

मंत्रालयातील बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित

या बैठकीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार,नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे आयुक्त पराग जैन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमोल रमा नायक, अधीक्षक अभियंता दीपाली देशपांडे, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अनिल धस, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रूपनर, पर्यटन विकास विभागाचे महाव्यवस्थापक शेखर जैस्वाल, पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी आणि सिल्लोड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आप्पासाहेब काटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आता या निर्देशांनंतर सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांच्या वॉटर ग्रीड योजनेची प्रलंबित कामे किती वेगाने पूर्ण होतात आणि नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित