“समाजसेवेचा आदर्श! 25 नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; 22 जणांना नव्या दृष्टीचा प्रकाश”
महाराष्ट्र वाणी
पुणे (प्रतीनीधी) दि १० :- समाजसेवेचा उत्तम आदर्श घालून देणारा उपक्रम माय माऊली केअर सेंटर, समता फाउंडेशन मुंबई आणि एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, मोहम्मदवाडी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत 25 गरजू नागरिकांना मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
दि. 8 मार्च 2026 रोजी कात्रज येथील माय माऊली केअर सेंटरमधून कात्रज, धनकवडी, पद्मावती, कोंढवा, खेड शिवापूर, राजगुरुनगर, हडपसर, बिबवेवाडी आदी परिसरातील 25 नागरिकांना एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, मोहम्मदवाडी येथे नेण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या सर्वांपैकी 22 नागरिकांच्या मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या, तर उर्वरित नागरिकांवर पुढील उपचाराची प्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना पुन्हा माय माऊली केअर सेंटर येथे सुरक्षितपणे आणण्यात आले आणि त्यानंतर नातेवाईकांसोबत घरी पाठविण्यात आले.
या वेळी ला. विशाल वरुडे पाटील, ला. अश्विनी वरुडे पाटील आणि संस्थापक अध्यक्ष ला. विठ्ठलराव वरुडे पाटील उपस्थित होते. समाजातील गरजू आणि वृद्ध नागरिकांची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
माय माऊली केअर सेंटर ही संस्था वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची सेवा करणारी संस्था असून समाजातील गरजूंसाठी आरोग्यसेवेचे विविध उपक्रम राबवत आहे.
— समाजसेवेच्या या कार्यामुळे अनेक गरजू नागरिकांना पुन्हा नव्या दृष्टीचा प्रकाश मिळाला आहे.