शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा सल्ला; मान्सून आला, पण पावसाचा जोर नाही; पेरणीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा सल्ला; मान्सून आला, पण पावसाचा जोर नाही; पेरणीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्याची पुढील प्रगती अपेक्षित वेगाने होत नसल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर मर्यादित राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस सर्वत्र आणि सातत्याने होण्याची शक्यता कमी असल्याने खरीप हंगामातील मोठ्या प्रमाणावरील पेरणीसाठी तो पुरेसा ठरणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, १८ जूननंतर मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जून महिन्याच्या अखेरीस सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवून नियोजन करावे, तसेच पुरेसा पाऊस झाल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या मातीतल्या प्रत्येक घडामोडींचा विश्वासार्ह आवाज!