मौलाना आझाद महाविद्यालयात ‘आजीवन अध्ययन व विस्तार’ विभागाच्या शाखेची स्थापना
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची शाखा मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रो. अश्विन रांजणीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. या शाखेमुळे विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना कौशल्याधारित आणि उपयुक्त अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. गजानन सानप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत नव्याने सुरू झालेल्या शाखेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारूकी यांनी शाखेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अधिकाधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. या अभ्यासक्रमांमध्ये केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर नागरिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आरेफ पठाण, IQAC समन्वयक प्रा. जे. डी. शेख आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. अश्फाक खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. जे. डी. शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.