मेहरून तलावात बुडून मृत्यू पावलेल्या नदीम शेखच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व महापालिकेला एकता संघटनेचे निवेदन
जळगाव | प्रतिनिधी दि १० जून :- ७ जून रोजी जळगाव शहरातील मेहरून तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी एक, नदीम शेख अनिस (वय २४) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू तलावात बुडून झाला. नदीम हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्याच्यावर त्याचे वृद्ध आई-वडील तसेच लहान भाऊ आणि बहिणी अवलंबून होते. या दुर्दैवी घटनेनंतर एकता संघटनेच्या वतीने शासन व महापालिकेकडे कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.
या अनुषंगाने एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील कार्यालयात भेट दिली. यावेळी मंत्री महाजन यांचे स्वीय सहाय्यक उदय भालेराव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यात नदीमच्या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, जळगाव शहर महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त विठ्ठल गोसावी यांना देखील निवेदन देण्यात आले. ही भेट एकता संघटनेचे पदाधिकारी मुफ्ती खालीद यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी स्पष्टपणे महापालिकेने सामाजिक जबाबदारी स्वीकारून या कुटुंबाला तातडीने मदत करावी, असे निवेदनाद्वारे सांगितले.
शिष्टमंडळात सहभागी सदस्य:
या शिष्टमंडळामध्ये मुफ्ती खालीद, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, फारुक शेख, अनिस शहा, अनवर सिकलगर, आरिफ देशमुख, इमरान शेख, सईद शेख, नजमुद्दीन शेख, मुजाहिद खान, अल्ताफ मनियार, शेख निसार मुसा, जावेद शेख, रज्जाक पटेल, हंजला खालीद, शाहीर तेली यांचा समावेश होता.
छायाचित्रे:
1. एकता संघटनेचे शिष्टमंडळ श्री. उदय भालेराव यांना निवेदन सुपूर्द करताना.
2. अप्पर आयुक्त विठ्ठल गोसावी यांना मुफ्ती खालीद, हाफिज रहीम पटेल, फारुक शेख आदींच्या उपस्थितीत निवेदन देताना.