"मल्हार कोळी समाजासाठी पुढाकार!" इद्रीस मुलतानींची मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी भेट
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. १८ जून :- भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी मुंबई येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील मल्हार कोळी समाजाच्या जातप्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, तसेच अन्य सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
इद्रीस मुलतानी यांनी या भेटीत मंत्री महोदयांना सविस्तर मागणीपत्र सादर करून समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रमाणपत्रांचे विषय, आणि प्रशासकीय दुर्लक्ष याविषयी सखोल माहिती दिली. या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करत मंत्री डॉ. उईके यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील मल्हार कोळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन समस्यांवर ठोस तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीवेळी भाजपाचे प्रदेश सचिव तथा ज्येष्ठ नेते सुरेश बनकर हे देखील उपस्थित होते. या पुढाकारामुळे स्थानिक स्तरावर समाधान व्यक्त होत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामाजिक व शैक्षणिक समस्यांवर तोडगा निघण्याची आशा समाजबांधव व्यक्त करत आहेत.