मराठवाड्यातील अग्निवीरांची सैन्य दलात निवड प्रशिक्षणसाठी २ हजार ३५० अग्निवीर रवाना
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) ,दि.३ :- आर्मी रिक्रूटिंग कार्यालयाने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये आयोजित केलेल्या भरती मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवार यांना१९ जून ते ०३ जुलै २०२६ या कालावधीत अग्निवीर उमेदवारांना त्यांच्या संबंधित सैन्य प्रशिक्षण केंद्रांकडे रवाना केले.
निवडलेल्या उमेदवारांच्या या गटात तांत्रिक प्रवेशांतर्गत (Technical Entries) सुमारे ६०० उमेदवारांचा समावेश होता, जो भरती प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.ही आव्हानात्मक मोहीम 'अग्निबाज आर्टिलरी ब्रिगेड', विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी, पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार आणि भरती मेळाव्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व शासकीय विभागांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आली.
ही भरती प्रक्रिया दररोज सकाळी ०६:०० वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेत उमेदवारांच्या सर्व आवश्यक गरजांची आणि सुविधांची काळजी घेण्यात आली होती. बायोमेट्रिक पडताळणी, प्रमाणीकरण, कागदपत्रांची छाननी, सामान्य वैद्यकीय तपासणी, बॅचिंग आणि अंतिम रवानगी यांसारख्या प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडल्या, ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि अचूकता सुनिश्चित झाली. हे तरुण अग्निवीर लष्करी प्रशिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करत असताना ते राष्ट्राच्या आशा-आकांक्षा आपल्यासोबत घेऊन जात आहेत. त्यांच्या या प्रवासामुळे मराठवाड्यातील अनेक तरुणांना भविष्यात भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सामील होण्याची प्रेरणा मिळेल, असे आर्मी रिक्रूटिंग कार्यालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कळविले आहे.