मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा; सतीश चव्हाण महायुतीचे अधिकृत उमेदवार नाहीत : संजय

मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा; सतीश चव्हाण महायुतीचे अधिकृत उमेदवार नाहीत : संजय

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपचे नेते संजय केणेकर यांनी या मतदारसंघावर भाजपचा दावा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपची असल्याचे सांगत, आगामी निवडणुकीत ही जागा भाजपलाच मिळावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली असली, तरी ते महायुतीचे अधिकृत उमेदवार किंवा महायुतीच्या वतीने घोषित नेते नाहीत, असे केणेकर यांनी स्पष्ट केले. महायुतीकडून अद्याप या मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेदवारीचा अंतिम निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सामूहिक चर्चेनंतर घेतला जाईल. त्यामुळे अधिकृत निर्णय होईपर्यंत कोणत्याही नावाबाबत निश्चित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असेही केणेकर यांनी नमूद केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील विविध पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू असल्याने या जागेबाबत राजकीय उत्सुकता वाढली आहे. आता महायुतीचे वरिष्ठ नेते कोणाला उमेदवारी देतात, याकडे भाजप कार्यकर्त्यांसह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.