मदरसा आधुनिकीकरणासह अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रशासनाला प्यारे जिया खान यांचे महत्त्वाचे निर्देश

मदरसा आधुनिकीकरणासह अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रशासनाला प्यारे जिया खान यांचे महत्त्वाचे निर्देश
मदरसा आधुनिकीकरणासह अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रशासनाला प्यारे जिया खान यांचे महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

नाशिक दि ९ :- अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, उर्दू शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलावीत, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिले.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत खान यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह आयोगाचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्यारे जिया खान यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाशी संबंधित शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. मदरसा शिक्षणात आधुनिक बदल घडवून विद्यार्थ्यांना विविध भाषांसह व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मदरसा आधुनिकीकरणासाठी पात्र संस्थांनी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध असलेल्या अंदाजपत्रकीय निधीचा योग्य आणि प्रभावी वापर करून योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे खान यांनी सांगितले. मदरसा आधुनिकीकरणाशी संबंधित कामांचा तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुस्लिम कब्रस्तानांसाठी आवश्यक जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. या विषयात आयोगाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अल्पसंख्याकबहुल वसाहतींमधील मोकळ्या भूखंडांचा विकास करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या.

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध स्वरूपाची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, या योजनांची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे खान यांनी नमूद केले. ‘सबका साथ, सबका विकास’ या भूमिकेतून अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये शिक्षणाच्या संधी वाढविणे, लसीकरण, पूरक पोषण आहार तसेच मदरसा आधुनिकीकरणासारखे कार्यक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मदरसा आधुनिकीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. उर्दू शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत नगर परिषद प्रशासनाचे सहायक आयुक्त श्याम गोसावी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती सादर केली. स्वर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेसह अन्य योजनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाला अधिक चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.