‘बटर’च्या नावाखाली मार्गारीन? अमरप्रीत हॉटेलवर FDAची मोठी कारवाई; परवाना निलंबित!सडलेल्या भाज्या, खराब मशरूम, एक्सपायर्ड पिझ्झा बेस

‘बटर’च्या नावाखाली मार्गारीन? अमरप्रीत हॉटेलवर FDAची मोठी कारवाई; परवाना निलंबित!सडलेल्या भाज्या, खराब मशरूम, एक्सपायर्ड पिझ्झा बेस
‘बटर’च्या नावाखाली मार्गारीन? अमरप्रीत हॉटेलवर FDAची मोठी कारवाई; परवाना निलंबित!सडलेल्या भाज्या, खराब मशरूम, एक्सपायर्ड पिझ्झा बेस

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १३ :- जालना रोडवरील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर अन्न सुरक्षा विभागाने ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान हॉटेलच्या चिलिंग सेंटर आणि स्टोअर रूममध्ये अस्वच्छता तसेच अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

तपासणीवेळी सडलेल्या भाज्या, खराब झालेले मशरूम आणि मुदतबाह्य पिझ्झा बेस साठवून ठेवल्याचे आढळले. याशिवाय विना लेबल मार्गारीनचा साठाही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. मेनू कार्डमध्ये बटरचा उल्लेख असताना प्रत्यक्षात त्याऐवजी मार्गारीन वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हॉटेलच्या स्वयंपाकघरातील परिस्थितीही समाधानकारक नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. परिसरात सांडपाणी साचलेले, कचराकुंड्या उघड्या अवस्थेत तसेच खाद्यपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या FIFO प्रणालीचा अभाव आढळून आला.

अन्नाच्या गुणवत्तेसोबतच स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे गंभीर निरीक्षण नोंदवून अन्न सुरक्षा विभागाने हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

दरम्यान, परवाना निलंबित असताना हॉटेलने कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अन्न सुरक्षा विभागाने दिला आहे.

या कारवाईमुळे शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन कितपत केले जाते, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.