पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा; स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा; स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा; स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी विविध भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मोती कारंजा, गांधी नगर, औषधी भवन, दुल्हा-दुल्हन चौक, संभाजीपेठ, नाथ मार्केट आणि सेना भवन परिसरातील नालेसफाईच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

पाहणीदरम्यान सुमारे ५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता करून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर भर देण्यात आला.

यावेळी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या तसेच सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोती कारंजा, गांधी नगर, औषधी भवन आणि नाथ मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देशही देण्यात आले असून त्याद्वारे नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

पावसाळ्यात पाणी तुंबणे, नागरिकांना होणारा त्रास आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नाल्यांवरील आवश्यक ठिकाणी जाळ्या बसविणे, कचरा टाकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश मकरिये यांनी दिले.

यावेळी उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, उपअभियंता आरती नवगीरे, सहायक आयुक्त रमेश मोरे आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेकडून शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

👉 शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.