नागपुरातील युवक काँग्रेस अध्यक्षांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध; दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाव सन्मान यात्रा’दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासोबत पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पदयात्रेदरम्यान काही पोलिस अधिकाऱ्यांकडून शिवराज मोरे यांच्याशी आक्रमक पद्धतीने वर्तन करण्यात आले. या प्रकारात मोरे यांना दुखापत झाल्याचा दावाही निवेदनातून करण्यात आला आहे.
या घटनेमागे राजकीय दबाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजय डिडोरे पाटील यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनावर मुजाहिद पटेल, मोहम्मद जाकीर शेख, फैज, सुफियान पठाण, दुर्गेश वैद्य, ऋषिकेश महाजन, अक्षय घाळ, विकास घाळ, लक्ष्मण कचकुरे, श्रीराम तांगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलिस प्रशासनाकडून या निवेदनावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित