दोन महिन्यांपासून सांडपाण्यात रोशन गेट परिसर; काँग्रेसचा महापालिका प्रशासनाला इशारा, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास रास्तारोको आंदोलन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- रोशन गेट, प्रभाग क्रमांक १३ येथील मासूम चिल्ड्रन हॉस्पिटलच्या अंडरग्राउंड भागात मागील जवळपास दोन महिन्यांपासून ड्रेनेजचे सांडपाणी साचल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम सय्यद अब्बास यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
निवेदनानुसार, सांडपाणी दीर्घकाळ साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली असून डास व जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवासी, नागरिक तसेच विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या समस्येबाबत संबंधित झोन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सध्या बजेट उपलब्ध नसल्याने काम करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न केवळ निधीअभावी प्रलंबित ठेवणे योग्य नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
साचलेले दूषित पाणी तातडीने पंपाद्वारे बाहेर काढावे, ड्रेनेज लाईन, चेंबर व पाइपलाइनची पाहणी करून अडथळा दूर करावा, तसेच आरोग्य विभागामार्फत जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय चंपाचौक ते कैसर कॉलनी चौरस्त्यापर्यंत नाली चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या ठिकाणीही संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीच्या निधीतून आवश्यक कामे पूर्ण करावीत आणि संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून स्थळ पाहणी व अहवाल तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांत स्थळ पाहणी करून प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली नाही, तर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अॅड. सय्यद अक्रम यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे या प्रश्नावर आगामी काळात काँग्रेस आणि महापालिका प्रशासनामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.