समस्याग्रस्त महिलांसाठी १७ ऑगस्ट रोजी ‘महिला लोकशाही दिन’; तक्रारींच्या निवारणासाठी प्रशासनाचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांच्या अडचणी व तक्रारी थेट शासकीय यंत्रणेसमोर मांडता याव्यात, तसेच त्यांचे तातडीने निवारण व्हावे, या उद्देशाने सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय ‘महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील महिलांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडणार आहे.
महिलांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या तक्रारींचे कायदेशीर व निर्धारित कालावधीत निवारण आणि समस्याग्रस्त महिलांना योग्य मार्गदर्शन व न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिला लोकशाही दिनासाठी तक्रार किंवा निवेदन विहित नमुन्यात आणि दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे. अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असावा. मात्र, आस्थापनाविषयक, सेवाविषयक आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
वैयक्तिक, कौटुंबिक किंवा शासकीय कार्यालयांशी संबंधित तक्रारी असलेल्या महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत उपस्थित राहून अर्ज सादर करावा. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून प्राप्त तक्रारींवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी आणि अडचणी प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.