कुणबी जात प्रमाणपत्र अवैध; गोलटगावच्या जि.प. सदस्या ज्योती शिंदे यांचे सदस्यत्व धोक्यात

कुणबी जात प्रमाणपत्र अवैध; गोलटगावच्या जि.प. सदस्या ज्योती शिंदे यांचे सदस्यत्व धोक्यात
कुणबी जात प्रमाणपत्र अवैध; गोलटगावच्या जि.प. सदस्या ज्योती शिंदे यांचे सदस्यत्व धोक्यात

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ ऑगस्ट :- जिल्ह्यातील गोलटगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ज्योती सुधाकर शिंदे (दहीहंडे) यांचे सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षित गटातून निवडणूक लढविणाऱ्या शिंदे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने ३० जुलै रोजी अवैध ठरविले आहे.

सच्चिदानंद ऊर्फ सचिन साहेबराव खलसे (रा. कारोळ, ता. गोलटगाव) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर समितीचे अध्यक्ष देवाप्पा गावडे, सदस्य डॉ. दीपक खरात आणि सदस्य सचिव देवीदास कोकाटे यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून सुनावणी घेतली.

प्रहार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ज्योती शिंदे यांनी जात प्रमाणपत्रासाठी शिवछत्रपती विद्यालय, संभाजीनगर येथील 'ज्योती श्रीधर दहीहंडे' या नावाचा शाळा प्रवेश व निर्गम उतारा सादर केला होता. मात्र, या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याचे समितीच्या निदर्शनास आले.

जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे ज्योती शिंदे यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावर संकट निर्माण झाले असून, पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.