कमलनयन बजाज रुग्णालयासोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार; ‘मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी’चा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू

विद्यार्थ्यांना विद्यापीठासह बजाज रुग्णालयात मिळणार प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षण

कमलनयन बजाज रुग्णालयासोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार; ‘मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी’चा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू
कमलनयन बजाज रुग्णालयासोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार; ‘मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी’चा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ८ :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि उद्योग-संलग्न शिक्षणाला चालना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्र (DDUKK) आणि कमलनयन बजाज रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना बी.एस्सी. मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी (MIRT) या व्यवसायाभिमुख पदवी अभ्यासक्रमासोबत प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रामार्फत चार वर्षांचा, आठ सत्रांचा आणि १७६ क्रेडिट्सचा हा अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) सुरू करण्यात आला आहे. आधुनिक वैद्यकीय प्रतिमांकन तंत्रज्ञान, रेडिओलॉजिकल विज्ञान आणि क्लिनिकल कौशल्य यांचा समन्वय साधणे हा अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या संदर्भातील सामंजस्य करारासाठी शुक्रवारी (दि. ७) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. भारती गवळी, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. भास्कर साठे, डॉ. कुणाल दत्ता यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते.

सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. प्रशांत अमृतकर आणि कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस यांनी स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव, शीतल आनंदगावकर, कृष्णा जाधव, प्रा. अमोघ सांबरे, प्रा. विशाल उशीर, प्रा. रत्नदीप हिवराळे, डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचीही भेट घेतली.

शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव

या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता आधुनिक निदान तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रतिमांकन क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रातील शैक्षणिक प्रशिक्षणासोबत कमलनयन बजाज रुग्णालयात क्लिनिकल आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

उच्च शिक्षण संस्था आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची व्यावसायिक क्षमता, रोजगारक्षमता आणि तांत्रिक कौशल्ये अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. भविष्यातील कुशल आणि तंत्रज्ञानसज्ज आरोग्यसेवा मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रोजगाराच्या नव्या संधी

मेडिकल इमेजिंग, रेडिओलॉजी आणि आधुनिक निदान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध व्यावसायिक संधींसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी अधिक सक्षम करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न या उपक्रमातून साध्य होणार आहे

.