एसटी प्रवासात डिजिटल क्रांती! ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्डचे लोकार्पण; प्रवास होणार अधिक सुलभ
महाराष्ट्र वाणी
मुंबई( प्रतिनिधी) दि १ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या नव्या स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि कॅशलेस होणार असून, प्रवाशांना आता तिकीटासाठी रोख रकमेची गरज भासणार नाही. ‘वन नेशन, वन कार्ड’ संकल्पनेला बळ देणारी ही योजना राज्यातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.
यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना डिजिटल, जलद आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असून एसटी सेवेला आधुनिकतेची नवी दिशा मिळणार आहे.
“आता एसटी प्रवासात रोख रक्कम नव्हे, तर स्मार्ट कार्डच ठरणार ‘स्मार्ट’ पर्याय!”