आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई / छत्रपती संभाजीनगर | 17 जून :– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, श्रीमती मिनलताई खतगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून येथे जात, धर्म किंवा पार्श्वभूमी न पाहता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. मी त्याचा जिवंत पुरावा आहे. मला तीन वेळा आमदार आणि आता जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली याबद्दल पक्षश्रेष्ठींचा मी मनापासून आभारी आहे.”

जिल्हा संघटना बळकट करण्याचा निर्धार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष क्रमांक एक बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युवक, महिला, शेतकरी आणि स्थानिक नेतृत्वाला संधी देत गावपातळीपासून नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला.

महिला नेतृत्वाला प्राधान्य, अर्थसहाय्याचे पाठबळ आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देणे, हा पक्षाचा आगामी अजेंडा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.