आता जिल्ह्यातच शिकता येणार! ITI विद्यार्थ्यांसाठी स्थानिक उद्योगातच अॅप्रेंटिसशिपची संधी

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ११ जून :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ITI विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातीलच स्थानिक उद्योगांमध्ये अॅप्रेंटिसशिप देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित संस्थांना आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच त्यांच्या जिल्ह्यातील नामांकित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार असून त्यासाठी विद्यावेतन देखील मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, प्रवास खर्च आणि स्थलांतराची अडचण टळणार असून त्यांना घराजवळच रोजगार प्रशिक्षण मिळणार आहे.
मंत्री लोढा यांनी यासंदर्भात सांगितले की, "स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना उद्योगजगताची जवळून ओळख मिळेल आणि उद्योजकतेस चालना मिळेल."
हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षणपुरता न राहता, प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून भविष्य घडवण्याची दिशा ठरू शकतो.