अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर मंत्री अतुल सावे संतप्त; “नागरिकांना होणारा त्रास सहन करणार नाही”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १८ :- शहर आणि परिसरातील वाढत्या वीज समस्यांवर मंत्री Atul Save यांनी महावितरण अधिकाऱ्यांची जोरदार कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची वाताहात होत असेल आणि त्यांना त्रास सहन करावा लागत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपले काम अधिक गांभीर्याने घ्यावे, असे निर्देश देतानाच आवश्यक कामांसाठी निधीची अडचण असल्यास आमदार निधीतून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र कामातील दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा कठोर इशाराही त्यांनी दिला.
सध्या अनेक भागांत ट्रान्सफॉर्मर बिघाड, वाढता लोड आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने वीज यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून महावितरणने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सावे यांनी नमूद केले.
मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत आणि सुरळीत पूर्ण करण्याच्या सूचना देत, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
“जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष नाही; वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हायलाच हव्यात!”