समाजसेवक सुमित पंडित यांचा अनोखा वाढदिवस – ५८व्यांदा रक्तदान करत जनजागृती

समाजसेवक सुमित पंडित यांचा अनोखा वाढदिवस – ५८व्यांदा रक्तदान करत जनजागृती
समाजसेवक सुमित पंडित यांचा अनोखा वाढदिवस – ५८व्यांदा रक्तदान करत जनजागृती

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ जून :– जागतिक रक्तदाता दिन आणि समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी सलून जटवाडा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमात १३ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर १०वी व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बेगमपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत जो उपक्रम कोणताही गाजावाजा न करता पार पाडला जातो, तोच खरा माणुसकीचा सण असतो."

कार्यक्रमात सत्यम सूर्यकांत पाटील व शिवम पाटील या दहावीतील जुळ्या भावांसह गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या शिबिरात सुमित पंडित (O निगेटिव्ह) यांच्यासह उमेश निकम (भारतीय सैनिक), सुरेश फसाटे, किशोर पवार, ज्ञानेश्वर पंडित, अनिल राऊत, कार्तिक वाघ, राहुल म्हस्के, रत्नाकर खंडागळे, वाल्मिक चव्हाण, दत्तू सपकाळ, अथंनी वस्तक या १३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

विशेष म्हणजे, समाजसेवक सुमित पंडित यांनी आज त्यांच्या आयुष्यातील ५८व्या वेळेस रक्तदान केले. "मी ठणठणीत आहे, रक्तदानाने त्रास होत नाही," असे नमूद करत त्यांनी तरुणांना आवाहन केले, "एकदा तरी रक्तदान करून पाहा – हीच खरी माणुसकीची सेवा!"

सुमित पंडित यांनी "रक्तदात्यांना पुढील १ महिना २१ दिवस सलून सेवा मोफत" देण्याची घोषणा करत, रक्तदानास प्रोत्साहन दिले. “रक्त हे सरकारी रुग्णालयातच द्यावे, जेणेकरून गरजू रुग्णांना मोफत मिळू शकेल,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी आतापर्यंत ११९ पेक्षा अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो गरजूंना रक्त मिळवून दिले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पिंपळे, कल्पेश पंडित, अशोक ग्राम, राम पंडित, सौ. पूजा पंडित, लक्ष्मी पंडित यांचे विशेष सहकार्य लाभले.

 एक हात रक्ताचा – हजारो जीव वाचवणारा!

समाजासाठी प्रेरणादायी ठरलेला हा उपक्रम खरंच माणु

सकीची ओळख पटवतो.