“राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा! पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ‘यलो अलर्ट’ जाहीर”

“राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा! पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ‘यलो अलर्ट’ जाहीर”

महाराष्ट्र वाणी

मुंबई (प्रतिनिधी) दि २८ :- राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी उष्णता वाढत असली तरी दुसरीकडे पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी उत्तर कोकणात उष्ण आणि दमट वातावरण होते, मात्र शनिवारी तापमानात काहीशी घट झाली.

विदर्भात मात्र उष्णतेचा जोर कायम असून, अकोला येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही भागांत तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच्या कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो.

रविवारी सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

⚠️ ‘यलो अलर्ट’ कुठे?

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी ३० मार्च रोजी पावसाचा अंदाज आहे. तसेच ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी कोकणसह राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

🌆 मुंबईत उष्णतेपासून दिलासा

मुंबईत शनिवारी तुलनेने तापमानात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सांताक्रूझ येथे ३२ अंश तर कुलाबा येथे ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी शुक्रवारी सांताक्रूझ येथे ३७ अंशांपेक्षा जास्त तापमान होते, त्यामुळे एका दिवसातच जवळपास ५ अंशांनी घट झाली आहे.

हवामान तज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे तसेच पश्चिमी विक्षोभ यामुळे राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण तयार होत आहे.

“उन्हाच्या तडाख्यातून थोडा दिलासा मिळणार असला, तरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र कायमच आहे!”