“राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवा; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा” – बाळा नांदगावकर

“राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवा; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा” – बाळा नांदगावकर
“राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवा; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा” – बाळा नांदगावकर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १८ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हा पदाधिकारी “नवसंकल्प मेळावा” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात संघटन विस्तार, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी उपस्थित पदाधिकारी, अंगीकृत सेना पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांना संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जनसंपर्क वाढवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार घराघरांत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व विधानसभा, शहर, तालुका, विभाग आणि शाखास्तरावरील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराष्ट्र सैनिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृह मनसेमय झाले होते. याचवेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.

संघटन विस्तार, नवीन जबाबदाऱ्यांचे वाटप, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि पक्षाची जनाधार वाढविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला. नव्या उमेदीने आणि नव्या संकल्पाने पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

“राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि महाराष्ट्राच्या हितासाठीचा संघर्ष अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने सक्रियपणे कार्यरत राहावे,” असा संदेश बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिला.

वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील घडामोडींचा विश्वासार्ह आवाज!