"रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोधून कारवाई; मनपाचा स्वच्छतेसाठी धडक अॅक्शन मोड"

एका दिवसात 500 हून अधिक व्यावसायिक आस्थापनांची तपासणी; 90 हजारांहून अधिक दंड वसूल, 18 जुलैनंतर अनधिकृत बॅनर-होल्डिंगवरही गुन्हे दाखल होणार

"रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोधून कारवाई; मनपाचा स्वच्छतेसाठी धडक अॅक्शन मोड"
"रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोधून कारवाई; मनपाचा स्वच्छतेसाठी धडक अॅक्शन मोड"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि विद्रुपीकरणमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात कुठेही कचरा फेकणारे, सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करणारे तसेच अनधिकृत बॅनर, होर्डिंग आणि स्टँडी लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार दर सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शहरातील प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये 29 दक्षता पथकांमार्फत विशेष स्वच्छता तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 296 अंतर्गत हॉटेल्स, उपाहारगृहे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांची स्वच्छतेची तपासणी करण्यात येत आहे.

18 जुलैनंतर अनधिकृत बॅनर-होर्डिंगवर कठोर कारवाई

मनपा प्रशासनाने शहरातील सर्व नागरिक व व्यावसायिकांना 18 जुलैपर्यंत अनधिकृत बॅनर, होर्डिंग आणि स्टँडी स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर मनपा ही सामग्री हटवून संबंधितांविरुद्ध शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

500 हून अधिक आस्थापनांची तपासणी; 90 हजारांचा दंड

उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी विशेष मोहिमेदरम्यान 500 पेक्षा अधिक व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 90 हजार रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.

सीसीटीव्हीतून शोधून होणार कारवाई

मनपा प्रशासनाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे आणि शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच मोहिमेदरम्यान 13 जुलै रोजी रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप मार्गावरील वॉकिंग प्लाझा परिसरात एका दुचाकीस्वाराने दोन पिशव्या कचरा रस्त्यावर फेकून पळ काढला. पथकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पसार झाला. उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी काढलेल्या छायाचित्राच्या आधारे संबंधित दुचाकीचा क्रमांक MH20BP3303 ओळखण्यात आला असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधिताचा शोध सुरू आहे.

व्यावसायिकांमध्ये सकारात्मक बदल

मनपा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील अनेक व्यावसायिकांनी आता कचरा रस्त्यावर न टाकता थेट घंटागाडीत देण्यास सुरुवात केली आहे. दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृती आणि समुपदेशनावरही भर दिला जात असल्याने स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल दिसून येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पथकाच्या कार्याचे कौतुक

महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजिद आणि सभागृह नेते गोविंद केंद्रे यांनी स्वच्छता पथकाच्या कामाचे कौतुक करत अधिक प्रभावी कारवाईसाठी प्रोत्साहन दिले.