शहरात अनधिकृत होर्डिंग्ज १८ जुलैपर्यंत हटवा, अन्यथा दंडासह कायदेशीर कारवाई; आयुक्त अमोल येडगे यांचा इशारा

शहरात अनधिकृत होर्डिंग्ज १८ जुलैपर्यंत हटवा, अन्यथा दंडासह कायदेशीर कारवाई; आयुक्त अमोल येडगे यांचा इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) , दि. १६ :- शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर्सविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. शहराचे सौंदर्य, शिस्त आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी विनापरवानगी उभारण्यात आलेली सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्स शनिवार, १८ जुलैपर्यंत स्वतःहून हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

महानगरपालिकेकडून शहरभर अनधिकृत जाहिरातींवर सातत्याने कारवाई सुरू असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग्ज आणि बॅनर्स उभारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती, संस्था, संघटना आणि जाहिरातदारांना हा अंतिम इशारा देण्यात आला आहे.

मनपाने दिलेल्या मुदतीनंतरही अनधिकृत होर्डिंग्ज अथवा बॅनर्स आढळल्यास महानगरपालिकेची पथके ते तात्काळ हटविणार आहेत. याशिवाय संबंधितांवर लागू असलेल्या नियमांनुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

शहराचे विद्रुपीकरण रोखणे, रस्ते व सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, महानगरपालिकेने सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व्यापारी आणि जाहिरातदारांना नियमांचे पालन करून शहर सुशोभीकरणाच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.