“मेल्ट्रॉन येथे लॅप्रोस्कोपिक शिबिराचे भव्य शुभारंभ”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि २४ :- महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ तसेच मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने दि. 24/03/2026 रोजी मेल्ट्रॉन रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन मा. डॉ. श्रीमती सुनिता संजय सोळुंके (सभापती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभाग क्र. 09 चे माननीय नगरसेवक मा. श्री. काकासाहेब काकडे, मा. श्रीमती वैशाली कोरडे, मा. श्री. संजय चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. शिरसाट, डॉ. दवंडे, डॉ. कल्पना राठोड, डॉ. विकास देवकर, असिस्टंट मॅट्रन श्रीमती मीनल ठोकळ, सिस्टर इंचार्ज श्रीमती मीना आढाव, श्रीमती कल्पना म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होते. मेल्ट्रॉन रुग्णालयचा सर्व कर्मचारी यांच्या नियोजनबद् कार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यात आले .
या शिबिरामध्ये 14 महिलांवर यशस्वीपणे मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आयोजित मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून एकूण 190 महिलांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
मोफत लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व अल्पकालीन विश्रांतीची आवश्यकता असलेल्या पद्धती असून महिलांसाठी वेदनामुक्त व जलद आरोग्यलाभ देणाऱ्या ठरत आहेत. या शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्यालाही बळकटी मिळत आहे.
यापुढेही मनपाच्या सहा रुग्णालयांमधून (सिडको एन-8, सिडको एन-11, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, मेल्ट्रॉन रुग्णालय) नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरतर्फे करण्यात येत आहे.