महाराष्ट्राला विरोधीपक्षनेता कधी? उद्धव ठाकरे यांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल; शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटले
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि.१७ :- महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याला अद्याप विरोधीपक्षनेता मिळालेला नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेत्याची निवड होणे अपेक्षित असताना आजतागायत नियुक्ती करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र सादर केले.
महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता नसणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे शिवसेनेकडून नमूद करण्यात आले. विरोधी पक्ष हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून सरकारच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी विरोधीपक्षनेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्मरणपत्रात सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान विरोधीपक्षनेत्याची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विधानसभेच्या कामकाजात संतुलन राखण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ही नियुक्ती लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधानपरिषद गटनेते अॅड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, महेश सावंत, कैलास पाटील आणि संजय देरकर उपस्थित होते.
विरोधीपक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर पडत असल्याने राज्याच्या राजकारणात यावरून पुन्हा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
— महाराष्ट्र वाणी
जनतेच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर आमची नजर!