मराठवाड्याच्या पत्रकारितेचा सन्मान! डॉ. कृष्णा केंडे यांना राज्य शासनाचा 'पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी पत्रकारिता पुरस्कार'

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि. २५ जून :–
एबीपी माझाचे मराठवाडा ब्युरो चिफ डॉ. कृष्णा केंडे यांना महाराष्ट्र शासनाचा 'पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी पत्रकारिता पुरस्कार' जाहीर झाला असून, या सन्मानामुळे मराठवाड्यातील पत्रकारिता क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. कृष्णा केंडे हे गेली अनेक वर्षे ग्रामीण प्रश्न, सामाजिक असमतोल, विकासाच्या दिशा आणि प्रशासनाच्या भानावर आधारित रिपोर्टिंग करत आहेत. त्यांच्या मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील मांडणीमुळे ते प्रेक्षकांमध्ये आणि क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवून आहेत.
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. केंडे म्हणाले,
"हा सन्मान केवळ माझ्या कामाचा गौरव नाही, तर माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाच्या विश्वास, पाठिंबा आणि प्रेमाचे प्रतिक आहे. आपली साथच माझ्या पत्रकारितेला दिशा देते."
पत्रकारिता क्षेत्रातील हा एक मानाचा टप्पा असून, यानंतर त्यांच्या कार्यातून नव्या उंचीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"आपल्या आवाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारांच्या यशानेच लोकशाही अधिक सक्षम होते!"