फोटोसेशन संपलं... आता सायकली धूळ खातायत! पंतप्रधानांच्या ‘इंधन बचाव’ संदेशाचा फक्त दिखावा?

फोटोसेशन संपलं... आता सायकली धूळ खातायत! पंतप्रधानांच्या ‘इंधन बचाव’ संदेशाचा फक्त दिखावा?

महाराष्ट्र वाणी (नजीमोद्दीन काजी )

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :– इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सायकलचा वापर वाढविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरातील अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सायकलवरून कार्यालयात जाऊन या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. मात्र, या उपक्रमाचे वास्तव काय आहे, याचे चित्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आवारात पाहायला मिळत आहे.

महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी सायकली भेट दिल्या होत्या. या सायकलींचा नियमित वापर होऊन पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र सध्या महापालिकेच्या आवारातील झाडाखाली तीनही सायकली साखळीने कुलूपबंद अवस्थेत उभ्या असल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा, धूळ आणि आता सुरू होणारा पावसाळा यामुळे या सायकलींची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. नियमित वापर आणि देखभालीअभावी या सायकली लवकरच भंगारात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंधन बचतीचा संदेश प्रत्यक्षात किती गांभीर्याने घेतला गेला? सायकल चालवून काढलेले फोटो आणि प्रसिद्धीसाठी राबविलेले उपक्रम हे केवळ दिखाव्यापुरतेच होते का? पर्यावरण संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाचा वापर केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आला का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीच अशा उपक्रमांकडे दुर्लक्ष करत असतील, तर सामान्य नागरिकांकडून सकारात्मक बदलाची अपेक्षा कशी करायची, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

— महाराष्ट्र वाणी “पर्यावरणाचे संदेश फलकांवर नव्हे, तर कृतीत दिसले तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो.”