दोन आठवडे उलटले, ध्वनीप्रदूषणाचा अहवाल कुठे?; पुणेकर मंचाचे आंदोलन
गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी, गुन्हे आणि कारवाईचा तपशील जाहीर करण्याची मागणी; पोलीस, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाब विचारला
पुणे दि ११ :- गणेशोत्सव संपून दोन आठवडे उलटले, तरी उत्सवादरम्यान झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी, ध्वनीमापनाच्या नोंदी आणि संबंधित मंडळांवर केलेल्या कारवाईचा अहवाल अद्याप जाहीर का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करत लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने रविवारी (११ ऑक्टोबर) बालगंधर्व चौकात आंदोलन केले. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कायदे आणि न्यायालयीन आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तक्रारी हजारो, कारवाईचा अहवाल कुठे?
गणेश विसर्जन मिरवणूक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे किती उल्लंघन झाले, किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती गुन्हे दाखल झाले आणि संबंधित मंडळांवर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
एकीकडे गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, रस्त्यांवरील मंडप, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मंचाने केली.
न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप
राष्ट्रीय हरित लवादाने शांतता क्षेत्रातील ध्वनीप्रदूषणाबाबत कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नाची दखल घेत विविध उपाययोजनांबाबत आदेश दिल्याचे मंचाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या आदेशांनुसार ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी यंत्रणा उपलब्ध ठेवणे, ध्वनिवर्धक वापरण्याचे परवाने ठळकपणे प्रदर्शित करणे, आवश्यकतेनुसार अनामत रक्कम घेणे आणि नियमांचे उल्लंघन करणारी ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करण्यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
ध्वनीप्रदूषणाबाबतच्या न्यायालयीन निर्देशांमध्ये आवाजाच्या मर्यादेचे पालन, मंडळांना परवानगी देताना एकत्रित ध्वनीपातळीचा विचार आणि निर्धारित मुदतीत अहवाल सार्वजनिक करण्याबाबतही तरतुदी असल्याचे मंचाने नमूद केले. मात्र, या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पोलीस यंत्रणा, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
ध्वनीमापनाच्या नोंदी आणि कारवाईचा तपशील जाहीर करा
गणेशोत्सवाच्या सर्व दिवसांतील डेसिबल मोजणीच्या नोंदींसह सविस्तर अहवाल तातडीने जाहीर करावा. तसेच ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या विविध मंडळांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केली.
नवरात्र, दिवाळीसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा
नवरात्रोत्सवानंतर दिवाळी तसेच विविध धर्मांचे सण आणि महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे होणार आहेत. या सर्व काळात ध्वनीप्रदूषणविषयक कायदे आणि न्यायालयीन आदेशांची समान व कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मंचाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
नागरिकांच्या सूचना मागवून ध्वनीवर्धक वापराबाबतची स्पष्ट नियमावली तातडीने जाहीर करावी, जेणेकरून सण-उत्सव साजरे करताना नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि कायदेशीर मर्यादांचा आदर राखला जाईल, अशी मागणीही त्यांनी केली.
आंदोलनात नागरिकांचा सहभाग
या आंदोलनात मुकुंद किर्दत, चिंतामणी कांगो, अशोक मेहंदळे, डॉ. सिमी आठवले, आशिष गुंजाळ, श्रीकांत भिसे, डॉ. राहुल सावंत, नीता केळकर, राजश्री गावडे, शीला परळीकर, गिरिजा गोडबोले, शुभदा जोशी, ज्योती जाधव, अनुजा जोशी, हेमंत गोळे, पूनम माजगावकर, शंकर थोरात, अनंत झानपुरे, बापूसाहेब शिरोळे, वैदेही कुलकर्णी, चेतन पटवर्धन, अपर्णा आठवले, महादेव कराडकर, विवेक काशीकर, सुनील क्षिरसागर, अंकुश पाटील, रामचंद्र पराष्टेकर, श्रीनिवास गडकरी, अवधूत धर्मेंद्र, शुभदा सावुजी, मनीष गडे, कौस्तुभ ठकार, संजय खांदोडे, माधुरी दाबक, विवेक सरपोतदार, राजीव आगाशे, सुवर्णा जोशी, सुहास क्षीरसागर, अनिता पाटकर, अशोक अळवणी, माणिकचंद बाहेती, श्रीधर घाणेकर, समर्थ सावंत, प्रशांत कुलकर्णी, विनायक बेलापूरे, रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित
— लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच