पत्र्याच्या शेडमधील मुलगा बनला IPS; भिकन रोजेकरांनी जिद्दीने जिंकली UPSCची लढाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ :- भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ या छोट्याशा गावातील भिकन जगन रोजेकर (वय २७) यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS पदावर निवड मिळवली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भिकन रोजेकर यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते, तर गावाकडे अवघी दोन एकर जमीन आहे. आई-वडील मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी कधीही मागे हटले नाही. त्यांच्या कष्टावरच भिकन यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला.
भिकन रोजेकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथील शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मोठे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते पुढे दिल्ली येथे गेले आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर अभ्यास, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत देशात ८१२ वी रँक मिळवली आणि IPS पद गाठले.
अत्यंत खडतर परिस्थिती, अनेक अडचणी आणि संघर्षांचा सामना करत भिकन रोजेकर यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव सपकाळ गावाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
“स्वप्न मोठं असलं आणि त्यासाठी प्रामाणिक मेहनत असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्कीच सापडतो,” याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे भिकन रोजेकर यांची ही यशोगाथा.
पत्र्याच्या शेडमधून सुरू झालेला प्रवास आज IPSपर्यंत पोहोचला… जिद्दीची ही कहाणी अनेक तरुणांसाठी नवी प्रेरणा ठरणार आहे.