“धर्म नाही, माणुसकी मोठी!” — रसूल बाबांच्या कुटुंबासाठी धावले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
परळी (प्रतिनिधी) दि २९ :- राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणून खासदार Dr. Shrikant Eknath Shinde पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेनेच्या ‘शिवसंवाद दौऱ्या’दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी येथे घडलेल्या एका दुःखद घटनेनंतर त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेने अनेकांचे मन हेलावले.
परळी येथील रसूल गफुर सय्यद उर्फ रसूल बाबा (वय ६५) हे व्यवसायाने भाजी विक्रेते होते. अत्यंत साधे आणि कष्टकरी जीवन जगणारे रसूल बाबा एका निवेदनासाठी बैठकीच्या ठिकाणी आले होते. मात्र याचवेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ही घटना समजताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ केज येथील त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दुःखात खचलेल्या परिवाराचे सांत्वन करत, “या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा दिलासाही त्यांनी दिला.
कुटुंबाचा आधार हरपलेल्या रसूल बाबांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी या भावनेतून शिवसेना पक्षातर्फे तातडीने ५ लाख रुपयांची मदतही डॉ. शिंदे यांनी दिली. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर आलेच, पण राजकारणातही माणुसकी जिवंत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली.
दिवंगत रसूल बाबांना शिवसेना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
“नेतृत्व तेच… जे संकटात आधार बनतं!”