झेप्टोच्या गोदामात धूळ, कोळिष्टके अन् गंजलेले रॅक; अन्न परवाना निलंबित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- ऑनलाइन ग्रोसरी वितरण क्षेत्रातील झेप्टो लिमिटेडच्या कांचनवाडी, पैठण रोड येथील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याने संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांनी ७ ऑक्टोबर रोजी गोदामाची अचानक तपासणी केली. या तपासणीत निर्धारित ७२ गुणांपैकी गोदामाला केवळ २४ गुण मिळाले. यावरून तेथील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या.
गोदामात धूळ, कोळिष्टके आणि गंजलेले रॅक
तपासणीदरम्यान गोदामात अस्वच्छता, धूळ व कोळिष्टके, गंजलेले साठवण रॅक आणि अन्नपदार्थ जमिनीवर ठेवल्याचे आढळले. याशिवाय शीतगृहातील तापमान नियंत्रण योग्य नसणे आणि कीड प्रतिबंधक व्यवस्थेतील त्रुटीही निदर्शनास आल्या. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच आवश्यक कागदपत्रे आणि ऑडिट अहवालांच्या बाबतीतही कमतरता आढळून आल्या.
नवीन आवक, विक्री आणि वितरणावर बंदी
या अनियमिततांची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत प्रशासनाने परवाना निलंबित करण्याची कारवाई केली. त्यानुसार, संबंधित गोदामात नवीन अन्नसाठा आणणे, अन्नपदार्थांची विक्री करणे, ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करणे आणि त्यांचे वितरण करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
फेरतपासणीनंतरच व्यवसाय सुरू करता येणार
गोदामातील सर्व त्रुटी दूर करून अन्न व औषध प्रशासनाकडून फेरतपासणी करून घेणे आणि लेखी परवानगी मिळवणे आवश्यक आहे. तोपर्यंत संबंधित गोदामातून अन्न व्यवसाय सुरू करता येणार नाही.
या कारवाईमुळे ऑनलाइन ग्रोसरी वितरण सेवांमध्ये अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
महाराष्ट्र वाणी | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)