कटकट गेट ते पोलिस मेस : 'अघोषित पार्किंग'मुळे वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त
महाराष्ट्र वाणी.com
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३जून :– शहरातील कटकट गेट ते पोलिस मेस दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या ‘अघोषित पार्किंग झोन’मध्ये रूपांतरित झाला असून, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हा सिमेंट रस्ता बांधला असला, तरी रस्त्यावर अतिक्रमण आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे त्याचा उपयोगच खुंटला आहे.
या मार्गावर असलेल्या अनेक फंक्शन हॉल आणि हॉटेलांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे विवाह, समारंभ वा अन्य कार्यक्रमांच्या वेळी पाहुण्यांची वाहने सरळ रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबते आणि नागरिक वैतागले आहेत.
फक्त दोन-तीन कार्यालये अपवाद वगळता इतरांकडून रस्त्यावरच स्वतःच्या पार्किंगसारखा वापर केला जातो. परिणामी, वाहनधारकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकदा वाद, शाब्दिक चकमकी आणि मारहाणीच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, "जेव्हा फंक्शन हॉल्स मोठ्या रकमांचे भाडे घेतात, तेव्हा पाहुण्यांसाठी पार्किंगची सुविधा पुरवणं ही त्यांची जबाबदारी आहे. जर जागेचा अभाव असेल, तर अशा व्यवसायांना मोकळ्या जागेत स्थलांतरित व्हावं लागेल."
महापालिकेने यापूर्वी ‘पे अँड पार्क’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ती योजना अद्याप कागदापुरतीच राहिली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, प्रशासनाच्या उदासीनतेकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
वाहतूक पोलीस आणि महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या व्यावसायिक इमारतींकडे पार्किंगची सोय नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा जनतेचा संयम सुटण्यास वेळ लागणार नाही.