अंभईकरांची पाण्यासाठी वणवण; ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक हैराण!
महाराष्ट्र वाणी
अंभई (ता. सिल्लोड) दि ५ :- सिल्लोड तालुक्यातील अंभई हे बाजारपेठेचे आणि तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक गाव म्हणून ओळखले जाते. गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी केळगाव धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ग्रामपंचायतीच्या ठिसाळ कारभारामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे यंदा गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्याच्या तडाख्यात गावातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी मिळविण्यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना खासगी टँकर किंवा इतर स्रोतांचा आधार घ्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी वाहेद (बाबू) देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचायत समितीकडून चार टँकर उपलब्ध झाले असून पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत असून त्यांच्या कारभारावरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून गावातील पाणीपुरवठा नियमित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ — आपल्या गावातील प्रत्येक प्रश्नाला देतोय आवाज!