ADCC निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा झटका; पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद

ADCC निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा झटका; पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ADCC) निवडणुकीत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बँकेतील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महायुतीतील विविध नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीत समीर सत्तार यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने संपूर्ण प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली.

यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या विरोधात समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर त्यांनी माघार घेतली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत सुरुवातीपासूनच हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.

समीर सत्तार यांच्यासह पालकमंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट, आमदार रमेश बोरणारे आणि संजना जाधव यांच्या अर्जांवरही काही उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. या सर्व आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समीर सत्तार यांच्यासह कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या अर्जाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला.

अर्ज बाद होण्यामागचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब फरकाडे यांनी समीर सत्तार यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती. समीर सत्तार यांनी ज्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्या संस्थेवर थकबाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच जिल्हा बँकेची शाखा त्यांच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतरित झाल्याने त्यांना वैयक्तिक लाभ झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या आक्षेपांचा विचार करून समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर केला. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या घडामोडीनंतर अब्दुल सत्तार पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी — राजकारणातील प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अचूक आणि विश्वासार्ह आढावा!