1 फेब्रुवारीला एमपीजेचे राष्ट्रीय अधिवेशन; ‘सन्मानाने जगण्याचा अधिकार’ विषयावर प्रशांत भूषण, सआदतुल्लाह हुसेनी यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. 30 जानेवारी 2026
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि ३१ :- मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ) यांच्या वतीने “सन्मानाने जगण्याचा अधिकार” या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत शहरात दिनांक 30 जानेवारी रोजी प्री-कन्व्हेन्शन पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला एमपीजेचे प्रदेश सचिव मेहमूद खान व प्रदेश मीडिया सचिव एस. जी. हक़ यांनी संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई, खासगी रुग्णालयांतील अवाजवी खर्च आणि शिक्षणातील वाढती विषमता हे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले.
मेहमूद खान यांनी सांगितले की मराठवाड्यासारख्या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. टँकरवर अवलंबून राहणे हे संविधानातील कलम 21 अंतर्गत असलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले.
एस. जी. हक़ यांनी ‘फाईव्ह स्टार हॉस्पिटल संस्कृती’वर टीका करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत झाल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना महागड्या उपचारांसाठी कर्ज घ्यावे लागत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांचा दर्जा खालावल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण फक्त श्रीमंतांपुरते मर्यादित राहिले असून, त्यामुळे समाजातील आर्थिक व सामाजिक दरी वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
एमपीजेचे राष्ट्रीय अधिवेशन दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या अधिवेशनात ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत भूषण, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसेनी, एपीसीआरचे सचिव वासिक नदीम, ‘युवा हल्ला बोल’चे अध्यक्ष अनुपम, एमपीजे सुप्रीम कौन्सिलचे संयोजक जमीर कादरी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व वकील अभय टकसाल मार्गदर्शन करणार आहेत.
एमपीजेने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाधिष्ठित सामाजिक न्याय व सन्मानाच्या जीवनासाठीच्या या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी शहराध्यक्ष मुख्तार शेख, अध्यक्ष मोहसिन शेख, आदिल मदनी, सैयद शब्बीर, करीम बेग व अब्दुलकरीम खान आदी उपस्थित होते.
— सन्मानाचा हक्क मिळवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ!