शहराच्या पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनासह विकासकामांना गती द्या; अंबादास दानवेंची महापौरांसोबत चर्चा

सात ते नऊ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न, ४५ हजार नळजोडण्या आणि मिटमिटा सफारी पार्कवरही आढावा

शहराच्या पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनासह विकासकामांना गती द्या; अंबादास दानवेंची महापौरांसोबत चर्चा
शहराच्या पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनासह विकासकामांना गती द्या; अंबादास दानवेंची महापौरांसोबत चर्चा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि १० :- शहरातील पाणीपुरवठा, कचरा व घनकचरा व्यवस्थापन तसेच विविध विकासकामांना गती देण्याच्या मुद्द्यावर शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी महापौर समीर राजूरकर यांच्यासोबत सोमवारी (१० ऑगस्ट) सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना, प्रलंबित नळजोडण्या, कचरा व्यवस्थापन, मिटमिटा सफारी पार्क, एन-६ येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान व पुतळा तसेच मंजूर आणि प्रलंबित रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला सध्या सुमारे ३० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होत असले, तरी अनेक भागांमध्ये अद्याप सात ते नऊ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. शहरात सुमारे ४५ हजार नळजोडण्या देणे बाकी असून, त्या पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली.

दरम्यान, शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ५०० मेट्रिक टन कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच विविध ठिकाणी असलेल्या जुन्या कचरा साठ्यांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.

मिटमिटा सफारी पार्कसाठी झू प्राधिकरणाची परवानगी मिळविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच एन-६ येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान व पुतळ्याच्या कामासह शहरातील प्रमुख रस्त्यांच्या मंजूर व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.

प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशा सूचना आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केल्या.

याप्रसंगी मनपा गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर सुदाम सोनवणे, राशीद मामू, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, गोपाल कुलकर्णी, प्रमोद ठेंगडे, वीरभद्र गादगे, सचिन खैरे, राहुल सोनवणे, राहुल वाणी, मंगेश भाले, कान्हूलाल चक्रनारायण, दिनेश राजेभोसले, सुनीता सोनवणे व वैशाली कोरडे उपस्थित होते.