रस्ते पार्किंगच्या विळख्यात; शहरभर टोईंग कारवाईची नागरिकांची मागणी
रोशन गेट ते आझाद चौकनंतर प्रमुख मार्गांवरही नियमित दंडात्मक मोहिम राबविण्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- शहरातील जुन्या भागात रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुख्य रस्त्यांच्या कडेला तसेच वाहतुकीच्या मार्गात वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि आपत्कालीन वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे एखाद्या भागापुरती मर्यादित कारवाई न करता शहरभर नियमित टोईंग मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
शनिवारी कट कट गेट रोड परिसरात वाहतूक शाखेने रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमुळे काही काळ वाहतुकीला दिलासा मिळाला. मात्र, अशा मोहिमा सातत्याने राबविल्या गेल्या तरच बेशिस्त पार्किंगला आळा बसू शकतो, अशी नागरिकांची भूमिका आहे.
यापूर्वी महानगरपालिकेनेही कट कट गेट ते सावरकर चौक या मार्गावर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांविरोधात कारवाई केली होती. मात्र कारवाई थांबल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी वाहने उभी राहत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे केवळ अधूनमधून कारवाई करण्यापेक्षा नियमित तपासणी आणि दंडात्मक कारवाईची आवश्यकता व्यक्त होत आहे.
मंगल कार्यालयांमुळे संध्याकाळी कोंडी
कट कट गेट परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम असल्यास सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने दाखल होतात. या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक चालक मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावतो आणि काही वेळा मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते.
एमजीएम हॉस्पिटल रोड आणि निराला बाजार परिसरात सुरू असलेल्या टोईंग कारवाईच्या धर्तीवर शहरातील इतर गर्दीच्या आणि संवेदनशील मार्गांवरही नियमित कारवाई करण्याची गरज आहे.
या मार्गांवरही कारवाईची मागणी
सिटी चौक, बुड्डी लेन, लोटा कारंजा, शाहबाजार, कट कट गेट, चंपा चौक, रोशन गेट आणि टीव्ही सेंटर रोड यांसह प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर टोईंग तसेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मात्र, कारवाईसोबतच प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजनांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रमुख ठिकाणी स्पष्ट ‘नो पार्किंग’ फलक, अधिकृत पार्किंगची व्यवस्था आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
विशेषतः रुग्णालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष नियोजन करण्याची गरज आहे.
रस्ते वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी?
शहरातील अनेक रस्ते आधीच वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याचाच मोठा भाग पार्किंगसाठी वापरला जात असेल, तर वाहतूक कोंडीचा प्रश्न कसा सुटणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महानगरपालिका आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे शहरातील प्रमुख मार्गांचे सर्वेक्षण करून नो-पार्किंग झोन, टोईंग पॉइंट आणि अधिकृत पार्किंगची ठिकाणे निश्चित करावीत. नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई आणि त्याचबरोबर योग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्यास शहरातील बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यास मदत होईल.