महागाईचा फटका सलून व्यवसायालाही; राज्यभर सलून सेवांचे दर २० टक्क्यांनी वाढणार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि ६ :- वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सलून व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतींमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ यामुळे राज्यातील सलून व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने ग्रामीण आणि शहरी भागातील सलून सेवांच्या दरांमध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ ६ जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
नाभिक समाज हा केवळ सेवा पुरवणारा घटक नसून समाजातील विविध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वीजबिल, दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच शॅम्पू, हेअर कलर, फेशियल साहित्य, निर्जंतुकीकरण साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे सलून व्यवसाय चालवणे अधिक खर्चिक झाले आहे.
महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी सांगितले की, ग्राहकांना आर्थिक भार पडू नये यासाठी अनेक व्यावसायिकांनी दीर्घकाळ जुन्याच दरात सेवा दिल्या. परंतु सध्याच्या परिस्थितीत वाढलेला खर्च पेलणे कठीण झाल्याने दरवाढ अपरिहार्य ठरली आहे.
त्यांच्या मते, हा निर्णय नफा वाढविण्यासाठी नसून व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि हजारो नाभिक कुटुंबांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे. ग्राहकांनी या निर्णयाकडे केवळ दरवाढ म्हणून न पाहता, छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक वास्तवाशी जोडलेल्या प्रश्नाच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहनही महामंडळाने केले आहे.
राज्यातील नाभिक समाजाच्या मते, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय टिकवण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असून, त्यातून सलून व्यवसायाला काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
👉 छोट्या व्यावसायिकांवरील महागाईचा वाढता ताण आणि त्याचे सामान्य ग्राहकांवर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वाणीसोबत राहा.