मराठवाड्यातील दुष्काळावर काँग्रेस आक्रमक; १४ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’

खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद; शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी, पाणी-चारा आणि विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी

मराठवाड्यातील दुष्काळावर काँग्रेस आक्रमक; १४ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंगावकर, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अक्रम, माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार अनिल पटेल, कमाल फारुकी, प्रकाश मुगदिया, मोहन देशमुख, जगन्नाथ काळे, सरताज पठाण यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देणे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जफेडीसाठी आवश्यक सवलती द्याव्यात, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

१४ ऑक्टोबरला पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा

दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजता जनआक्रोश दुष्काळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पैठण गेट येथून सुरू होणारा हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, या उद्देशाने काँग्रेसने या आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

‘शेतकरी जगला तरच महाराष्ट्र जगेल!’ या घोषवाक्यासह दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित