संतोषीमातानगरात गावठी कट्टा जप्त! १९ वर्षीय तरुणाला अटक; मुकुंदवाडी पोलिसांची धडक कारवाई
मैदानाच्या भिंतीलगत लपवून ठेवले होते अग्निशस्त्र; मॅग्झीनसह कट्टा जप्त, न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असलेल्या मुकुंदवाडी पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संतोषीमातानगर येथील दोन एकर परिसरातील मैदानाच्या भिंतीलगत लपवून ठेवलेला गावठी कट्टा मॅग्झीनसह पोलिसांनी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी विशेष पथकाला परिसरात सतर्क गस्त घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. सणासुदीच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन कोणताही गुन्हा घडू नये, तसेच अवैध धंद्यांवर आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार संतोष भानुशे यांना गोपनीय बातमीदारामार्फत संतोषीमातानगर येथील मैदानाच्या भिंतीलगत एक स्टील बनावटीचा गावठी कट्टा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. ही माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी वरिष्ठांना दिली.
मैदानाच्या भिंतीलगत मिळाला कट्टा
वरिष्ठांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली. यावेळी प्रियांशु सतीश खोमणे (वय १९, रा. मुकुंदवाडी गाव, छत्रपती संभाजीनगर) हा तरुण तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा संतोषीमातानगर येथील दोन एकर परिसरातील मैदानाच्या भिंतीलगत लपवून ठेवल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर संबंधित जागेची पाहणी केली असता तेथे मॅग्झीनसह एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून हे अग्निशस्त्र जप्त केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित गांगुर्डे करीत असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे सखोल चौकशी सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित गांगुर्डे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नरसिंग पवार, पोलीस हवालदार विक्रमसिंग राऊळ, संदीप वैद्य तसेच पोलीस अंमलदार भीमा पवार, अनिल थोरे, संतोष भानुशे, शाम आढे, विकास गुरुखेल, रविंद्र बेंडे, राहुल राठोड आणि दीपक इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित