एकीकडे कोट्यवधींचे कार्यालय, दुसरीकडे AIMIM गटनेता ८ महिन्यांपासून दालनाविना; मनपा आयुक्त-महापौरांचा घेराव

एकीकडे कोट्यवधींचे कार्यालय, दुसरीकडे AIMIM गटनेता ८ महिन्यांपासून दालनाविना; मनपा आयुक्त-महापौरांचा घेराव
एकीकडे कोट्यवधींचे कार्यालय, दुसरीकडे AIMIM गटनेता ८ महिन्यांपासून दालनाविना; मनपा आयुक्त-महापौरांचा घेराव

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना महानगरपालिकेच्या निधीचा प्राधान्यक्रम काय असावा, यावरून AIMIMच्या नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले. गटनेता कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचा आरोप करत, दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाच्या गटनेत्याला मागील आठ महिन्यांपासून स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असा दावा AIMIMने केला आहे.

या प्रश्नावर AIMIMच्या नगरसेवकांनी बुधवार, ३० सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त आणि महापौर यांचा घेराव घालत विविध विकासकामे, महत्त्वाचे नागरी प्रश्न तसेच कथित पक्षपाती धोरणाचा निषेध केला.

AIMIM नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, दुष्काळामुळे नागरिक आणि शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अनेक मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी कर्ज काढावे किंवा इतर मार्गांनी पैसे उभे करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत जनतेकडून कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी मूलभूत नागरी सुविधांवर खर्च करण्याऐवजी आलिशान कार्यालयांसाठी वापरणे योग्य नाही, असा आक्षेप नगरसेवकांनी नोंदवला.

महानगरपालिका आवारात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चातून कार्यालय तयार करण्यात आल्याचा आरोप AIMIMकडून करण्यात आला. मनपात वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक असताना एवढ्या मोठ्या खर्चाची गरज काय, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

दुसरीकडे, महानगरपालिकेतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या AIMIMच्या गटनेत्याला मागील आठ महिन्यांपासून स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असा दावा विरोधी पक्षनेते समीर साजिद (बिल्डर) यांनी केला. एका गटासाठी मोठ्या खर्चातून कार्यालयाची व्यवस्था आणि दुसऱ्या प्रमुख विरोधी पक्षाला कार्यालयापासून वंचित ठेवणे हा दुजाभाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाला योग्य स्थान आणि आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याचे AIMIM नगरसेवकांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर आयुक्त व महापौर यांच्याशी चर्चा करून विरोधी पक्षाच्या गटनेत्याला तातडीने स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

“कराच्या माध्यमातून नागरिकांकडून जमा होणारा पैसा हा पाणी, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी प्राधान्याने वापरला पाहिजे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे,” अशी भूमिका AIMIM नगरसेवकांनी मांडली.

महानगरपालिकेच्या कारभारात पक्षपात सहन केला जाणार नाही. विरोधी पक्षाला आवश्यक लोकशाही अधिकार आणि सुविधा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा AIMIMकडून देण्यात आला.

– समीर साजिद (बिल्डर)

विरोधी पक्षनेता, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज