मतदार यादीत नाव नाही? २६ ऑक्टोबरपूर्वी संधी साधा! राज्यभर विशेष शिबिरे; १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबरला महत्त्वाची मोहीम
मुंबई दि १५ :- राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून सुटू नये, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्याची आणि नाव नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची महत्त्वाची संधी नागरिकांना मिळणार आहे.
२६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करावी. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित नमुन्यात अर्ज सादर करावा. हे अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करता येणार आहेत.
कोणत्या कामासाठी कोणता अर्ज?
- नमुना अर्ज क्रमांक ६ : मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी.
- नमुना अर्ज क्रमांक ७ : मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी.
- नमुना अर्ज क्रमांक ८ : पत्ता बदलणे, नाव किंवा इतर तपशिलांत दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी.
मतदान केंद्रांवर अधिकारी देणार मदत
या मोहिमेसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना अर्ज भरणे, नाव नोंदणी आणि तपशिलातील दुरुस्ती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
नाव तपासण्यासाठी आणि तक्रारींसाठी हेल्पलाइन
मतदार यादीतील नाव तपासताना किंवा अर्ज भरताना अडचण आल्यास नागरिकांना १९५० या मतदार हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्रातूनही मार्गदर्शन मिळू शकते.
जिल्हानिहाय हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
🔗 https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx
पात्र मतदारांनी ही संधी गमावू नये!
मतदार यादीत नाव नसल्यास मतदानाच्या वेळी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःचे आणि कुटुंबातील पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासावे. नाव समाविष्ट नसेल किंवा तपशिलात दुरुस्ती आवश्यक असेल, तर विहित नमुन्यात अर्ज करून २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित