भाजपच्या उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तारांच्या मुलाची एन्ट्री; औरंगाबाद -जालना मतदारसंघात खळबळ

भाजपच्या उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तारांच्या मुलाची एन्ट्री; औरंगाबाद -जालना मतदारसंघात खळबळ

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ :- विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला असून पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून सुहास शिरसाट यांची घोषणा केली आहे. मात्र, याच वेळी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत नवा पेच निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, समीर सत्तार स्वतः अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नसून त्यांच्या समर्थकांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी अर्ज सादर केला. या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला असून, हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे की प्रत्यक्ष बंडखोरीची नांदी, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

शिवसेनेच्या पारंपरिक जागेवरून नाराजी?

हा मतदारसंघ हा अनेक वर्षे शिवसेनेचा प्रभावक्षेत्र मानला जातो. यावेळी मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपकडे गेल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असल्याची चर्चा होती. त्यातच समीर सत्तार यांच्या उमेदवारीमुळे या नाराजीला राजकीय स्वरूप मिळाल्याचे बोलले जात आहे.

तिरंगी लढतीची शक्यता

या निवडणुकीत भाजपचे सुहास शिरसाठ, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाच्या देवयानी डोणगावकर आणि एमआयएमच्या इसाक खान यांनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून असल्याने समीर सत्तार शेवटपर्यंत मैदानात राहतात की माघार घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पुढील भूमिकेवर महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि निवडणुकीची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

👉 4 जूननंतरच स्पष्ट होणार चित्र; समीर सत्तारांची उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार की केवळ राजकीय दबावाचे शस्त्र, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.