"बंडाची तलवार म्यान! मुख्यमंत्री भेटीनंतर अब्दुल सत्तारांची माघार; मुलाचा उमेदवारी अर्जही घेणार मागे"

"बंडाची तलवार म्यान! मुख्यमंत्री भेटीनंतर अब्दुल सत्तारांची माघार; मुलाचा उमेदवारी अर्जही घेणार मागे"

महाराष्ट्र वाणी

मुंबई (प्रतिनिधी) दि ३ :- महायुतीतील वाढत्या नाराजीमुळे चर्चेत आलेले शिवसेना आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आपली भूमिका नरम केली आहे. मुख्यमंत्रीांसोबत झालेल्या चर्चेनंतर सत्तार यांनी महत्त्वाची घोषणा करत आपल्या मुलाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले.

अलीकडेच "भाजप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे" अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकींनी या वादावर पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सत्तार म्हणाले की, महायुतीतील काही स्थानिक पातळीवरील अडचणी आणि कार्यकर्त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी मुख्यमंत्रींसमोर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री हे संपूर्ण महायुतीचे नेतृत्व करत असून त्यांनी भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सत्तार यांनी सांगितले.

"मी कोणतेही आश्वासन किंवा पदाची मागणी केलेली नाही. आम्ही महायुतीचे आमदार आहोत आणि महायुती मजबूत राहावी हीच आमची भूमिका आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीत सत्तार यांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांबाबत तसेच शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा स्तरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विरोधकांपेक्षाही वाईट वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर सत्तार यांनी माघार घेतली होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर त्यांनी मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्याने महायुतीतील तणाव तात्पुरता निवळल्याचे मानले जात आहे.

महायुतीतील या घडामोडींमुळे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात स्थानिक पातळीवरील मतभेद कसे मिटवले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

— वाचा, विचार करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडीसाठी जोडलेले रहा ‘महाराष्ट्र वाणी’सोबत!