पर्यटनासाठी गेले, पण घडली दुर्दैवी घटना; गणपतीपुळ्यात बिडकीनचे पाच जण बेपत्ता! तरुणांचा शोध सुरू
महाराष्ट्र वाणी
गणपतीपुळे/प्रतिनिधी दि २० :- रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून एकूण १९ जणांचा ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान या ग्रुपमधील काही तरुण समुद्रात उतरले. मात्र, अचानक वाढलेल्या लाटांमुळे आणि समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच जण पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र समुद्रात उधाणासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक बोटींच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
या संदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही माहिती देत शोधकार्य सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अधिक अपडेट्ससाठी महाराष्ट्र वाणीसोबत जोडलेले रहा.