पदापेक्षा माणुसकी मोठी! विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जपली श्रमप्रतिष्ठा; माणुसकीचे प्रेरणादायी दर्शन

पदापेक्षा माणुसकी मोठी! विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जपली श्रमप्रतिष्ठा; माणुसकीचे प्रेरणादायी दर्शन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- स्वच्छ भारत अभियान ही केवळ सरकारी योजना नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ राहतात.

२ ऑगस्ट रोजी पी. एस. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेनंतर घडलेली एक घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. स्पर्धा संपल्यानंतर बहुतांश जण छायाचित्रे आणि सेल्फी घेण्यात व्यस्त होते. मात्र, मैदानाच्या एका कोपऱ्यात काही स्वच्छता कर्मचारी शांतपणे प्लास्टिक आणि कचरा गोळा करत होते.

याच वेळी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची नजर त्या स्वच्छता सेविकांकडे गेली. कोणताही औपचारिकपणा न दाखवता त्यांनी थेट त्या कर्मचाऱ्यांजवळ जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्यासोबत छायाचित्रही काढले.

या साध्या पण अर्थपूर्ण कृतीतून "पदापेक्षा माणुसकी मोठी" आणि "श्रमाचा सन्मान हीच खरी श्रमप्रतिष्ठा" हा महत्त्वाचा संदेश समाजासमोर आला.

स्वच्छता कर्मचारी, घंटागाडीवरील कामगार आणि सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रमांचा आदर करणे ही समाजाची जबाबदारी आहे. स्वच्छ भारताचे स्वप्न केवळ हातात झाडू घेऊन पूर्ण होणार नाही, तर प्रत्येक श्रमिकाचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवली, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि संवेदनशील समाज घडू शकेल.

"स्वच्छ शहरासाठी श्रमिकांचा सन्मान करूया" हा संदेश या प्रसंगातून अधोरेखित झाला आहे.