पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट! अर्ज माघारीनंतर ४१ उमेदवार रिंगणात; २३ ऑक्टोबरला मतदान

पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट! अर्ज माघारीनंतर ४१ उमेदवार रिंगणात; २३ ऑक्टोबरला मतदान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सहआयुक्त मंजुषा मिसकर उपस्थित होत्या. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी निवडणुकीच्या तयारीसह मतदान आणि मतमोजणीच्या नियोजनाची माहिती दिली.

६२ उमेदवारांचे अर्ज; छाननीत ८ अर्ज अवैध

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ६२ उमेदवारांनी एकूण ९२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत ८ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ५४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी एका, तर ९ ऑक्टोबर रोजी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. परिणामी, आता ४१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

३ लाख २६ हजार ७०१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

या निवडणुकीत एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २ लाख ४८ हजार ९७१ पुरुष, ७७ हजार ७१७ महिला आणि १३ इतर मतदारांचा समावेश आहे.

मतदानासाठी एकूण ८४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ९३५ केंद्राध्यक्ष आणि २ हजार ८१४ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार घेतले जाणार आहे.

मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील वुडस्टर्म डेकार येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी ४ हजार ४५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती करण्यात आली असून रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी आहेत.

मदत कक्षाची सुविधा

निवडणुकीसंदर्भात माहिती व मदतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मतदार आणि संबंधितांना ०२४०-२३४३१६४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

आता ४१ उमेदवारांमध्ये निवडणुकीची चुरस वाढणार असून २३ ऑक्टोबरच्या मतदानाकडे पदवीधर मतदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

— महाराष्ट्र वाणी न्यूज