‘मतदारांचा अधिकार धोक्यात घालू नका’; निवडणूक आयोगाविरोधात SDPIचे आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

‘मतदारांचा अधिकार धोक्यात घालू नका’; निवडणूक आयोगाविरोधात SDPIचे आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
‘मतदारांचा अधिकार धोक्यात घालू नका’; निवडणूक आयोगाविरोधात SDPIचे आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- 

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI)च्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी क्रांती चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळण्यासंदर्भातील प्रश्न, मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेले बदल, Form-6 संदर्भातील वाद तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत SDPIच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनातून तीव्र चिंता व्यक्त केली.

‘एकाही पात्र नागरिकाचे नाव चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळले जाऊ नये’, अशी भूमिका SDPIने मांडली. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानिक पद्धतीने राबविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मतदाराचा अधिकार सुरक्षित करा’, ‘निष्पक्ष निवडणूक—मजबूत लोकशाही’, ‘संविधान वाचवा—लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

आंदोलनात SDPIचे जिल्हाध्यक्ष समीर शाह, जिल्हा महासचिव मोहसिन खान, जिल्हा समिती सदस्य उमर मिर्झा, मुबश्शिर फारुकी, हाफिज अबुजर पटेल (पूर्व विधानसभा अध्यक्ष), समीर पटेल (सचिव, फुलंबरी विधानसभा), रियाज सौदागर, आरिफ देशमुख, शफीउद्दीन शेख, मुबारक चौस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मतदारांचा मतदानाचा अधिकार, संविधानिक मूल्ये आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे SDPIने स्पष्ट केले.

अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी न्यूज